
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे आणि अहंकारामुळे येत्या काही दिवसांत बेस्टच्या तिकिटांचे वांदे होणार आहेत. तिकीट देण्यासाठी वापरल्या जाणाऱया ट्रायमॅक्सच्या मशीनमुळे आधीच कंडक्टर वैतागलेले असताना याच कंपनीला वारंवार मुदतवाढ देण्याचा अट्टहास महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सुरू ठेवला आहे. तिसऱयांदा या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी वादळी चर्चेनंतर फेटाळून लावला.
ट्रायमॅक्सला दिलेली यापूर्वीची मुदतवाढ ३० जूनला संपली आहे तर मशीन दुरुस्तीचा करार ११ जुलैला संपला आहे. या पार्श्वभूमीवर आयत्या वेळी प्रशासनाने मुदतवाढीचा प्रस्ताव आणला. समितीला गृहीत धरून आणलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे सुहास सामंत, अनिल कोकीळ यांच्यासह विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे सुनील गणाचार्य, श्रीकांत कवठणकर यांनी कडाडून विरोध केला.
मेट्रोची बाजारात तुरी
मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बेस्ट या सर्वांना लागू होईल असे एकच तिकीट असलेली नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची संकल्पना राबवण्यात येणार आहे, मात्र तोपर्यंत आहे तीच पद्धत सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावात म्हटले आहे. मात्र मोनो बंद पडली आहे, मेट्रोला अजून काही वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत ट्रायमॅक्सला मुदतवाढ देणार का, असा मुद्दा शिवसेनेचे सुहास सामंत आणि अनिल पाटणकर यांनी मांडला.
काय आहे प्रकरण
बेस्टमध्ये २०१० पासून ट्रायमॅक्स कंपनीच्या मशीनमधून तिकीट देण्याची पद्धत सुरू झाली. तीन वर्षांतच या कंपनीच्या मशीनमध्ये बिघाड व्हायला लागल्यामुळे कंडक्टरना त्रास सहन करावा लागत होता. त्यांना जुन्या पद्धतीची कागदी तिकिटेही सोबत बाळगावी लागत होती. तरीही या कंपनीला आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देण्यात आली. पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी आलेला प्रस्ताव सर्वपक्षीयांनी फेटाळला.



























































