
लोअर परळचा नवीन उड्डाणपूल बांधताना मुंबई महानगरपालिकेने पदपथासारख्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत ‘मॉर्थ’ (मिनिस्ट्री रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेज) आणि ‘आयआरसी’च्या (इंडियन रोड काँग्रेस) नियमांचे उल्लंघन केले आहे. दुसरीकडे रेल्वेने याच पुलावर नियमांचे पालन करीत महापालिकेच्या अधिकाऱयांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. रेल्वेने आपल्या अखत्यारीत असणाऱया भागात पदपाथ बांधले, मग महापालिकेने का बांधले नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.
लोअर परळ येथे नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलावर पदपथाची सोय नसल्याने गिरणगावकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या उड्डाणपुलाला पदपथ, बस थांबे व उतरण्या-चढण्यासाठी जिने होते, तशी व्यवस्था नव्या पुलाला पुन्हा करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पदपथाच्या कामाची सुरुवात लवकर झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गिरणगावकरांनी दिला आहे.
विविध कामानिमित्त लोअर परळ भागात दररोज पाच लाखांच्या आसपास लोक येतात. स्थानिकांचीदेखील गिरणगाव परिसरात ये-जा असते. या सर्वांसाठी नव्या पुलावर पदपथाची सोय झाली पाहिजे. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर काही वर्षांपूर्वी चेंगराचेंगरी होऊन 22 जण मृत्यू पावले होते. त्या दुर्दैवी घटनेची येथे पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेडेस्ट्रेरिअन फर्स्ट हे मुंबई महापालिकेचे धोरण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून आणि सुविधांपासून वंचित ठेवू नये, असे स्थानिकांचे मत आहे.



























































