
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाच, हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नाही, असे वृत्त एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. एएनआयशी बोलताना सरकारी सूत्रांनी सांगितले आहे की, नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीची कोणतीही शक्यता नाही.
गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र एएनआयला सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंधन दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सध्याच्या किमती स्थिर ठेवण्यावर भर देत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अनेक जागतिक तज्ञांनी कच्च्या तेलाच्या किमती वाढतील, असा अंदाज वर्तवला होता. यातच देशात इंधनाचे दर सध्या नियंत्रित असून, त्यात वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले आहे.



























































