
देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली . त्यानुसार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात 153 प्लांट उभारण्यात येणार होते. अद्याप केंद्र सरकारने एकाही प्लांटच्या उभारणीचे काम सुरू करणे दूरच, साधी टेंडर प्रक्रिया ही राबवलेली नाही. यातील एकही प्लांट आजपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. पण भाजपचे नेते केंद्राच्या गलथानपणावर पांघरूण घालून महाराष्ट्राची बदनामी करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केला. गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अपयश झाकण्यासाठी आरोप
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वाशिम, सातारा, हिंगोली, नगर, भंडारा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, धाराशीव आणि सिंधुदुर्गात ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबतचे पत्र केंद्र सरकारने दिले आहे. केंद्र सरकार स्वतःच हे प्लांट उभारणार आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आजपर्यंत एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला नाही. आणि महाराष्ट्रात तर एकही प्लांट उभारण्यास सुरुवातही झाली नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच भाजपचे नेते बिनबुडाचे आरोप करत आहेत याकडे अतुल लोंढे यांनी लक्ष वेधले.
केंद्राच्याच पातळीवर भ्रष्टाचार
कोरोनाच्या या भीषण संकटकाळात केंद्र सरकारने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि वाटपावर स्वतःचे नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारांना ती खुल्या बाजारातून खरेदी करता येत नाहीत आणि केंद्र सरकारही ही साम्रगी पुरवत नाही. पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी जात नाही. हे प्लांट उभारण्याचे काम केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरमार्फत करण्यात येत आहे. ज्या कामासाठी एका नव्या पैशाचा निधीच मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. जर यात भ्रष्टाचार झाला आहे असे भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर तो भ्रष्टाचार केंद्र सरकारच्या पातळीवर झाला असण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.





























































