जोगेश्वरीच्या ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम‘मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बारा बलुतेदारांच्या कलाकौशल्याची संस्कृती दर्शवणाऱ्या जोगेश्वरीतील ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’मध्ये प्रवेशासाठी आजपासून शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पालिका शाळा आणि खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या ठिकाणी विविध कलाकौशल्याची शिल्पे, संगीत कारंजे यासह वृक्ष, शोभेची झाडे, केली, मुलांसाठी झोपाळा, घसरगुंडी, मेरी-गो-राऊंड यासारखी विविध खेळणीदेखील आहेत.

शिवसेनेच्या पाठपुराव्यातून जोगेश्वरी पूर्व परिसरातील पूनम नगरमध्ये झालेले ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ हे अल्पावधीतच नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. या शिल्पग्रामात शिल्पांच्या माध्यमातून 12 बलुतेदारांच्या कलाकौशल्याची ओळख, विविध भारतीय नृत्यशैलींकरील आकर्षक व माहितीपूर्ण शिल्पे, संगीतमय कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. या शिल्पग्रामची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील गर्दीचे उच्चांक गाठत आहे. मात्र या गर्दीत मुलांची व पालकांची चुकामूक होण्याची शक्यता निर्माण होत आहे. शिवाय मोफत प्रवेश असल्यामुळे समाजकंटकांची संख्या वाढून मालमत्ता आणि शोभेच्या वस्तूंचे नुकसान होण्याचा धोकाही आहे. या पार्श्वभूमीवर शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ही ठरतात पर्यटकांची आकर्षणे
8.5 एकर भूखंडावर तयार करण्यात आलेल्या शिल्पग्राममध्ये बारा बलुतेदारांच्या शिल्पांमध्ये कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, भांगडा, गरबा यासह लाकणीचाही समावेश आहे. दररोज सुमारे 3 हजार नागरिक या शिल्पग्रामास भेट देतात, तर सुट्टीच्या दिवशी ही संख्या काही पटींनी वाढून 10 हजारांचा टप्पाही ओलांडते. दरम्यान, आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग शिल्पग्रामची देखभाल आणि आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.