
आजच्या काळात फिट राहण्यासाठी अनेकजण महागडे प्रोटीन शेक किंवा सप्लीमेंट्स यावर हजारो रुपये खर्च करतात. पण स्वत:ला तंदुरुस्त, फिट राहण्यासाठी खरेच महागडे प्रोटीन शेक किंवा सप्लीमेंट्ची गरज असते का? तर नाही. पारंपरिक पदार्थही आपल्याला तेवढीच ताकद देतात. बॉलीवूड अभिनेत्री नीतू चंद्रा ही देखील फिट राहण्यासाठी पारंपरिक पदार्थांवर विश्वास ठेवते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या फिटनेसचे गुपित उघड केले. कोणत्याही कृत्रिम प्रोटीन शेकऐवजी दररोज ‘सत्तू’ पिण्याला पसंती देते, असे ती म्हणाली.
भाजलेले चणे दळून तयार केलेला सत्तू बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. विशेषतः उन्हाळ्यात हे पेय शरीराला ऊर्जा देते असे मानले जाते. सत्तू पिण्याचे अनेक फायदेही आहेत. हे फायदेही आपण जाणून घेऊया…
स्नायूंच्या मजबुतीसाठी – सत्तू हा प्रथिनांचा एक उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी तर हे वरदानच आहे. यातील प्रोटीनमुळे स्नायूंची झीज भरून निघते आणि शरीर सुदृढ होते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण – सत्तूमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहींसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे (औषधे सुरू असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा).
पचनसंस्था राहते सुदृढ – सत्तूत असलेल्या ‘इन्सोल्युबल फायबर’मुळे पचनाच्या तक्रारी दूर होतात. गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
वजन घटवण्यासाठी प्रभावी – सत्तू प्यायल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अवेळी खाणे टाळले जाते, परिणामी वजन नियंत्रित राहते.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात – सत्तू शरीराला नैसर्गिकरित्या ‘डिटॉक्स’ करण्याचे काम करतो. शरीर आतून स्वच्छ राहिल्यामुळे ऊर्जेची पातळी वाढते आणि मन प्रसन्न राहते.
हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक – सत्तूचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असतो. हे रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते.
त्वचा आणि केसांचे सौंदर्य – सत्तूमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केसांची मुळे घट्ट होऊन त्यांची वाढ चांगली होते.
कसे बनवाल सत्तूचे सरबत?
हे पेय बनवणे अत्यंत सोपे आहे. एका ग्लास पाण्यात 2 मोठे चमचे सत्तूचे पीठ नीट मिसळून घ्या. त्यात चवीनुसार काळे मीठ, भाजलेली जिरे पूड आणि थोडे लिंबू पिळा. सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. तुमचे पौष्टिक सत्तू सरबत तयार आहे.
(टीप – आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.)



























































