दीन दिवाळी… धान्य दुकानातून अन्नधान्य आणि रॉकेल गायब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । धुळे

बहुसंख्य कष्टकऱयांच्या वसाहतीतील स्वस्त धान्य दुकानावर अन्नधान्य आणि रॉकेल मिळत नाही. त्यामुळे अनेक कष्टकऱयांना जीवन जगणे कठीण झाले आहे. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांना रॉकेल आवश्यक आहे. पण रॉकेल विक्रेता स्वस्त धान्य दुकानावर येऊन रॉकेल विक्री करण्याऐवजी रॉकेलची परस्पर विल्हेवाट लावतो अशी गाऱहाणी घेऊन मुस्लिम ओबीसी, एसबीसी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील अनेक वसाहतीमध्ये कष्टकरी राहतात. गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः दिवाळीच्या सणातच अनेकांकडून अन्नधान्य मिळण्याबाबत तक्रारी होत आहेत. स्वस्त धान्य दुकानावर शिधापत्रिका असूनही अन्नधान्य मिळत नाही. रॉकेल विक्रेता स्वस्त धान्य दुकानावर येत नाही. तो परस्पर रॉकेलची विल्हेवाट लावतो. प्रश्न विचारले तर स्वस्त धान्य दुकानदार अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे सांगतो. अनेकांनी शासनाला अभिप्रेत असलेल्या प्रणालीनुसार सोपस्कार पार पाडले आहेत. तरीही अन्नधान्य मिळत नाही. दुकानावरील मशिनवर अंगठय़ाचा ठसा देवूनही धान्य मिळत नाही. कारण, तांत्रिक अडचण आहे असे सांगितले जाते. त्यामुळे मुस्लिमी ओबीसी-एस.बी.सी. संघर्ष समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देवून चर्चा केली. अनेकांनी गाऱहाणी मांडली.

याबाबत उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी सांगितले की, प्रत्येक रेशन दुकानावर पॉज मशिन देण्यात आले आहे. त्यावर अंगठय़ाचा ठसा दिल्यानंतर ऑनलाइन प्रणाली सुरू होते. त्यानंतर धान्य वितरीत होते. तांत्रिक अडचणीमुळे अंगठय़ाचा ठसा ओळखण्यात मशिनलाही अडचणी येतात. पण, प्रत्येकाला त्यांच्या वाटेला अन्नधान्य मिळणारच असे म्हणत हुलवळे यांनी आंदोलकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात अशपाक शेख, जलील अलताफ, आरिफ अन्सारी, लुकमान शेख, जुबेर अन्सारी, अब्दुल वाहीद, सलिम शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.