20हून अधिक हिंदू मुलींशी संबंध, श्रद्धाला मारल्याचा पश्चात्ताप नाही; फाशी झाल्यास स्वर्गात मला अप्सरा मिळतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Walker Murder Case) क्रूरकर्मा आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याची नुकतीच पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चात्तापही त्याला नसून उलट फाशी झाल्यास आपल्याला स्वर्गात अप्सरा मिळतील असे त्याने म्हटल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने उघड केले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पॉलीग्राफ चाचणीदरम्यान आफताब पूनावाला याने केलेल्या खुलास्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. श्रद्धाची हत्या केल्याचा आफताबला अजिबात पश्चात्ताप नाही. उलट स्वर्गात (जन्नत) गेल्यावर आपल्याला अप्सरा (हूर) मिळतील असे आफताबने म्हटले. तसेच श्रद्धाच्या आधी बंबल या डेटिंग अॅपवरुन आफताब हा हिंदू मुलींना शोधायचा आणि आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धासोबत तो रिलेशनशीपमध्ये असतानाही त्याचे जवळपास 20हून अधिक हिंदू मुलींशी संबंध होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली

विशेष म्हणजे श्रद्धाची हत्या केल्यानंतरही त्याने पुन्हा एका हिंदू मुलीशी संबंध ठेवले होते. ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धाचा खून करून त्याने तिचे तुकडे फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते, त्याच फ्लॅटमध्ये तो आपल्या नव्या सावजासोबत रोमान्स करायचा. एवढेच नाही तर त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन नव्या प्रेयसीला आपल्या जाळ्यात अडकवले होते. तसेच तो अन्य काही हिंदू मुलींच्याही संपर्कात होता, अशीही माहिती समोर येत आहे.

श्रद्धाची हत्या करुन आफताबने तिच्या शरिराचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि काही दिवसात त्याने तुकड्यांची विल्हेवाट लावली. हत्येची कबूली दिली असली तरी, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चात्ताप दिसत नाही. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असेही त्याने पॉलीग्राफ चाचणीत म्हटल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे करण्याचा प्लॅन मुंबईतच आखल्याचेही त्याने सांगितले. ‘जागरण‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

आफताबला सोमवारी पॉलीग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आले. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला. तरीही तरुणांनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरूच ठेवले. अखेर चालकाने पोलीस व्हॅन पुढे नेली.

हत्या करून 35 तुकडे केले

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने अत्यंत थंड डोक्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. पुरावा मिटव्यासाठी रोज रात्री तो यातील एक तुकडा जंगलामध्ये फेकत होता. या हत्याकांडाचा सहा महिन्यांनी खुलासा झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.