
सामना प्रतिनिधी, मुंबई
ऐन उन्हाळय़ातही राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे टेन्शन असणार नाही. उन्हाळय़ात विजेची मागणी वाढलेली असताना कोळशाचा अपुरा पुरवठा आणि वाढत्या तापमानामुळे औष्णिक वीज केंद्रातील वीजनिर्मितीवर मर्यादा येतात. त्यामुळे ग्राहकांना भारनियमनाचे चटके सोसावे लागतात. पण यंदा महानिर्मिती आणि महावितरणने कोयना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्याने सध्या वीजनिर्मितीसाठी मिळणाऱया पाण्यापैकी 62 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आणीबाणीवेळी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत गरजेनुसार 1950 मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करता येणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता जवळपास 13 हजार मेगावॅट असली तरी त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. औष्णिक वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू करण्यास पाच-सात तास लागतात तर पुरेसा पाणीसाठा असल्यास कोयना वीज प्रकल्पातून केवळ एका मिनिटात 1950 मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती सुरू होऊन ग्रीडला जोडली जाते. महानिर्मितीने गेल्या आठ महिन्यांत केवळ 38 टक्के म्हणजे 26 टीएमसी एवढय़ा पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांच्या हाताशी सध्या 41 टीएमसी एवढे मुबलक पाणी आहे. त्यामधून 1500 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होऊ शकते.
2016-17 मध्ये केवळ 150-200 मेगावॅट वीजनिर्मिती
कोयना वीज केंद्रातून तयार होणारी वीज स्वस्त असल्याने महानिर्मिती आणि महावितरणने कोणतेही नियोजन न करता 2016-17 मध्ये उन्हाळय़ाच्या आधीच 60 टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. त्यामुळे ऐन उन्हाळय़ात येथून केवळ 150-200 मेगावॅट एवढी कमी वीजनिर्मिती होत होती. त्यामुळे महाराष्ट्राला भारनियमनाचे चटके सहन करावे लागले होते.
उन्हाळय़ात वाढणारी विजेची मागणी लक्षात घेत कोयनेच्या पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. गेल्या आठ महिन्यांत केवळ 26 टीएमसी पाणी वापरले असून सध्या धरणात 41 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळय़ात येथून मुबलक वीज उपलब्ध होईल.
-चंद्रकांत थोटवे, संचालक (महानिर्मिती)



























































