
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘प्लॅस्टिकबंदी’ची 100 टक्के अंमलबजावणी आजपासून होत असल्यामुळे सर्रास प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या मुंबईकरांच्या प्रबोधनासाठी पालिकेने वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, ताटे-चमचे, सजावट आणि पुनर्वापराचे शेकडो पर्याय या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली.
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेचे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या अंमलबजावणीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्लॅस्टिकमुळे पर्यावरण आणि मानवी जीवनालाच धोका निर्माण झाल्याचे सांगितले. आपण पुढची एक हजार वर्षे जगणार नाही, मात्र आमची मुले, पुढची पिढी जगण्यासाठी आपण आपले घर, बँक बॅलन्स-मालमत्ता सोडून जाण्यापेक्षा त्यांच्यासाठी चांगले पर्यावरण सोडून जाण्याची गरज असल्याचे अभिनेत्री काजोल म्हणाली, तर प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होणार असल्याचा विश्वास अभिनेता अजय देवगण याने व्यक्त केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार सुनील शिंदे, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, ‘सपा’चे गटनेते रईस शेख, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकर, अतुल शहा आदी उपस्थित होते.
अंमलबजावणीला मुदतवाढ नाही
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातूनही मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला कोणतीही मुदतवाढ मिळणार नसून उद्यापासून मुंबईसह राज्यभरात कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा ऱहास, प्रदूषणाचे दुष्परिणाम त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



























































