अकरावी प्रवेशाचे नो टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 21 जून रोजी जाहीर होणार आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा भरमसाठ जागा उपलब्ध आहेत. एकूण 2 लाख 36 हजार 591 जागांवर ऑनलाइन प्रवेश होणार आहेत. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 67 हजार 571 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 23 हजार 959 विद्यार्थ्यांनीच कॉलेज पसंतीक्रम भरले असून या विद्यार्थ्यांचाच गुणवत्ता यादीत समावेश होणार आहे. त्यामुळे यंदा अकरावीच्या हजारो जागा रिक्त राहणार आहेत.

आतापर्यंत प्रवेशाची स्थिती

नोंदणी             2,67,571

कॅप फेरीसाठी जागा 2,36,591

कॅप फेरीसाठी कॉलेज

पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी 2,23,959

कोटा प्रवेशासाठी जागा 1,42,684

कोटा प्रवेश घेतलेले     9854

कोटा रिक्त जागा 1,32,830

अकरावी प्रवेशाच्या नोंदणीला यंदा विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद सुरुवातीपासूनच मिळालेला नाही. कमी प्रतिसादामुळे यंदा नोंदणी आणि अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रकही पुढे ढकलण्यात आले. अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कोटय़ातील प्रवेश कॉलेजस्तरावर सुरू असून अकरावी ऑनलाइन प्रवेश संपेपर्यंत कोटय़ातील प्रवेश प्रक्रियादेखील सुरू राहणार आहे. कोटा प्रवेशासाठी मुंबई विभागात 1 लाख 32 हजार 830 जागा आहेत. यांपैकी अद्याप 9 हजार 854 जागांवरच प्रवेश झाले आहेत.

पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 21 जून सकाळी 10 ते 24 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे नंतर जाहीर केले जाणार आहे.

 तरीही विद्यार्थी प्रवेशाविना का राहतात?

अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध असताना दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसते. अर्ज भरताना झालेल्या चुका, दिलेल्या मुदतीत कार्यवाही न केल्याने तसेच मिळालेला प्रवेश न घेतल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. यातील काही विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही तांत्रिक चुकांमुळे प्रवेश मिळत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर तीन विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाते. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या जातात. मग या जागांवर प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबत जाऊन ऑक्टोबर महिन्यापर्यंत अकरावीत प्रवेश घेणे सुरूच राहते.