योगींच्या राज्यात शाळेत शौचालयच नाही, विद्यार्थ्यांना उघड्यावर उरकावे लागतायत विधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात शौचालये बांधली जात असल्याचा दावा केला जात आहे. मोदींच्या या योजनेचा मोठा गाजावाजा होत असताना मात्र भाजपचेच सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका सरकारी शाळेत शौचालयच नसल्याचे समोर आले आहे. शौचालयाअभावी या शाळेत मुलींची व शिक्षिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना नैसर्गिक विधी उरकण्यासाठी उघड्यावर बसावे लागत आहे. विशेष म्हणजे ही शाळा राज्याचे शिक्षणमंत्री सतीश द्विवेदी यांच्या मतदारसंघात येते. मिरर नाऊने याबाबत वृत्त दिल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तरप्रदेशामधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत हे धक्कादायक चित्र पहायला मिळाले आहे. या शाळेतील विद्यार्थी व प्रशासनाने याबाबत अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी अद्याप शाळेत शौचालय बांधले गेलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक भडकले असून शाळेला अवघे एक शौचालय देण्यास देखील राज्य सरकार आणि शिक्षण विभाग अपयशी ठरले असल्याची चपराक त्यांनी लगावली आहे. शाळेत एकही शौचालय नसल्याने शिक्षकांना आणि विद्यार्थांना उगड्यावर शौचास जावे लागते. जिल्हा प्रशासनाने आमच्या विनंतीकडे लक्ष दिले नसल्याचे या शाळेतील एका शिक्षकाने सांगितले. ही शाळा तब्बल दहा वर्षांपूर्वी बांधलेली आहे. मात्र यात एकही शौचालय बांधलेले नाही.