
सामना प्रतिनिधी । गंगाखेड
गंगाखेड येथील नगर परिषद मालकीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यापार संकुलातील बिअर शॉपीसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. याविरोधात युवासेनाचे संदीप राठोड यांनी ७ फेब्रुवारी रोजी उपोषणास प्रारंभ केला.
सभागृहात शिवसेना सभापती सीमा बाळासाहेब राखे यांनी मुद्दा उपस्थित केला तर सभागृहाबाहेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला शिवसेनेच्या दणक्याने अखेर नाहरकत प्रमाणपत्र रद्द ठरविले. याबाबतीत जिल्हा प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अल्का खैरे यांनी लेखी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
आज नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती. याचवेळी नगर परिषदेसमोर युवासेनेचे संदीप राठोड हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यापार संकुलातील गाळा (क्र.८) मधील भाडेकरू ज्ञानोबा ढेंबरे यांना नियमबाह्य बिअर शॉपीसाठीचे नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने उपोषण चालू केले होते. यावेळी सभागृहात शिवसेना सभापती सीमा बाळासाहेब राखे यांनी हे प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी रासपाचे गटनेते नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत सदरील प्रमाणपत्र रद्द करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. तर सभागृहाबाहेर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब निरस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे, बाळासाहेब राखे, बालासाहेब पारवे, युवासेनेचे स्वप्नील राठोड, सुभाष देशमुख, संदीप कदम, गणेश जवंजाळ आदींसह शेकडो शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या दणक्याने नगर परिषद प्रशासनासह नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया हादरून गेले. जिल्हा प्रशासन अधिकारी अल्का खैरे व विजयकुमार तापडिया यांनी उपोषणकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेत त्या बिअर शॉपी च्या व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करत असा अहवाल जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी यांना पाठवला असून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले.































































