भुसावळात आढळली 177 शाळाबाह्य मुले, शिक्षण विभागाच्याच सर्व्हेमधून प्रकार उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, जळगाव

6 ते 14 वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आरटीई अधिनियम 2009 नुसार, बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण असा कायदा लागू केला आहे. तरीदेखील शिक्षण विभागानेच केलेल्या सर्वेक्षणानुसार भुसावळ विभागात 14 वर्षांआतील जवळपास 177 बालके शाळाबाह्य असल्याचे आढळले आहे.

शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे आजही बहुतांश गावांमध्ये 14 वर्षाआतील बहुतांश बालके शिक्षणाच्या प्रवाहात नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक 115 विद्यार्थी यावल, मुक्ताईनगर – 48, रावेर -14 तर भुसावळ तालुक्यातील टहावळी येथील एका बालकाचा समावेश आहे. ही बालके नियमित शालेय शिक्षणाच्या प्रवाहात नसल्याचा अहकाल जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठकण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील 6 ते 14 वयोगटातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी शिक्षकांकडून गावा-गावांत शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो.
6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण दरवर्षी केले जाते. त्यात प्रवाहाबाहेर असलेल्या मुलांचा शोध घेतला जातो. ऊसतोडणीसाठी स्थलांतरीत होणाऱया कुटुंबांमधील मुले, उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांसोबत कामांमध्ये गुंतलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांनी सांगितले.