अजित पवारांना क्लिन चीट? सोशल मीडियावरील पत्रावर ACB चा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-ncp

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत येणाऱ्या 9 प्रकल्पांच्या ‘नस्तीबंदी’चे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भातील एका अधिकृत पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध लावण्यात आला असून त्यांना क्लिन चीट दिल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र या 9 प्रकल्पाच्या चौकशीचा अजित पवारांशी कोणताही संबंध नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महाव्यवस्थापक परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी मोठा आवाज उठवला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जारी करण्यात आलेले एक पत्रक व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये लघू पाटबंधारे विभागातील 9 प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. याचा संबंध अजित पवार यांच्याशी जोडून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यावर टीका केली जात आहे. अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्यानेच त्यांना हे बक्षिस मिळाल्याची टीका सोशल मीडियावरून केली जात आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या महाव्यवस्थापकांनीच आता यासगळ्यावर स्पष्टीकरण दिले आहे. परमबीर सिंग यांनी सांगितले की, ‘अजित पवार यांचा या प्रकरणांशी संबंध नव्हता. तसेच ज्या 9 प्रकल्पांसंदर्भात चौकशी बंद करण्यात आली आहे ती तात्पुरत्या स्वरुपाची आहे. जलसंचिनाच्या टेंडरच्या तक्रारींसंदर्भात आम्ही जवळपास 3000 टेंडर तपासत आहोत. ज्या प्रकल्पांची चौकशी आम्ही बंद केली आहेत तो एक नियमीत चौकशीचा भाग आहे. ज्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे, त्या आधीप्रमाणचे सुरू आहेत.’

तसेच ‘यासंदर्भात आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली किंवा न्यायलयाने आदेश दिले तर या प्रकरणांच्या चौकशीच्या फाईल पुन्हा खुल्या करण्यात येतील’, असेही ते म्हणाले.