उत्तर कोरियात महागाईचा उच्चांक, एक किलो केळ्याची किंमत तीन हजार रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर कोरियामध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. नागरिकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाहिये. खुद्द हुकुमशहा किम जोंग उनने ही बाब मान्य केली आहे. किम जोंग उनचे 20 किलो वजन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर कोरियामध्ये किम जोंग उन आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये देशाच्या  परिस्थितीवर चर्चा झाली. त्यात देशात अन्न टंचाई असून परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी देशात वादळ आल्याने त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्राला बसला. वादाळामुळे गरजेपुरतेही धान्य पिकवता न आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हुकुमशहा किम जोंग उनने ही बाब मान्य केली.

उत्तर कोरियामध्ये खाण्या पिण्याच्या वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तर कोरियाच्या स्थानिक माध्यमांनुसार एक किलो केळी तब्बल 3 हजार रुपयांना विकली जात आहे.

उत्तर कोरियामध्ये कोरोनामुळे परिस्थिती अजून बिकट झाली आहे. उत्तर कोरियाने आपल्या शेजारील देशांशी असलेल्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा चीनशी असलेल्या व्यापारावर परिणाम झाला आहे. उत्तर कोरिया धान्य, खत, इंधनासाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. इतकेच नाही तर उत्तर कोरियावर अनेक देशांनी अण्वस्त्रांच्या वापरामुळे बहिष्कार घातला आहे.  त्यामुळे संकट आणखी बिकट झाले आहे.

या सगळ्यात किम जोंग उनचे वज १५-२० किलोंनी घटले असल्याचे समोर आले आहे. पण त्याचे वजन नेमके कशामुळे कमी झाले आहे हे कळाले नाही. देशात कितीही संकट आले तरी त्याचा फटका उत्तर कोरियाच्या हुकुमशहांना बसत नसतो. दोन दिवसांपूर्वी किम जोंगचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यात किम जोंगचे वजन कमी झाल्याचे दिसत आहे. किम जोंगची तब्येत बिघडल्याने वजन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात अन्न संकट असल्याची बाब किमने मान्य केली आहे. ही बाब अतिशय दुर्मीळ मानली जाते. यापूर्वी 1990 साली तत्कालीन हुकमशहांनी अशी बाब मान्य केली होती. कारण त्यावेळी रशियाचे विघटन झाले होते आणि रशियाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने देशात लाखो नागरिकांचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाला होता.