
सामना ऑनलाइन । वॉशिंग्टन डी.सी.
शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? पण हो.. हे खरं आहे. आपल्याला रंग, चव, वास, ध्वनि, स्पर्श कळण्यासाठी पाच ज्ञानेंद्रियं दिली आहेत. त्यांचा वापर करून आपण रोजच्या जगण्यातलं अत्यंत प्राथमिक तरीही महत्त्वाचं असं ज्ञान मिळवत असतो. रंग ओळखण्यासाठी डोळ्यांची जी संरचना केलेली असते, त्याचा अभ्यास करून शास्त्रज्ञ निष्कर्ष काढतात. मात्र, नाकाच्या बाबतीत ही गोष्ट आजवर शक्य नव्हती. पण, शास्त्रज्ञांनी ही गोष्टही शक्य केली आहे.
नाक हा आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांमधला सर्वात महत्त्वाचा अवयव. श्वासोच्छश्वास घेण्यासाठी आपण नाकाचा वापर करतो तसाच विविध वास घेण्यासाठीही करतो. पण, नाकाला एकाच वेळी जर विविध वास घ्यायचे असतील तर नाक वासांचं वर्गीकरण नेमकं कसं करतं, याविषयी सल्क या संस्थेने अॅरिझोना विद्यापीठाशी संलग्नपणे काम करत एक विशिष्ट परिमाण शोधलं आहे. शास्त्रज्ञांनी २९ ऑगस्ट रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात आपलं निरीक्षण नोंदवलं आहे.
एखाद्या व्यक्तीच्या आवाजाच्या चढ-उतारावरून किंवा शब्दफेकीवरून आपण त्या व्यक्तिच्या बोलण्याचा रोख ओळखतो. तसेच एखादी वस्तू पाहिल्यावर तिचा रंग व आकार ओळखतो. या क्रिया कान आणि डोळे यांच्या अंतर्गत संरचनेमुळे घडतात. ही संरचना नेमकी कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी विशिष्ट परिमाणं उपलब्ध आहेत. मात्र नाकाच्या बाबतीत अशी कोणतीही परिमाणं उपलब्ध नव्हती. आता शास्त्रज्ञांनी हीच गोष्ट शोधून काढली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नाकातील तंतुंच्या विशिष्ट संरचनेमुळेच मानवी मेंदू वेगवेगळे वास ओळखू शकतो, तसंच या संरचनेमध्ये नाक एकाच वेळी अनेक वासांमधूनही चांगल्या-वाईट वासांचं वर्गीकरण करू शकतं.


























































