मातेला स्तनपानापासून रोखणे हा कौटुंबिक छळच, नवऱ्याला न्यायालयाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळाला स्तनपान करण्यापासून मातेला रोखणे हा कौटुंबिक छळच आहे असा स्पष्ट निर्वाळा मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. न्यायालयाने असे करणाऱ्या नवऱ्याला दोषी ठरवत बायकोला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तक्रारदार महिला आणि नवरा हे दोघेही भूलतज्ज्ञ असून नवरा हा जर्मनीत नोकरीस आहे.

तक्रारदार महिलेने नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर 15 महिन्यानंतर न्यायालयात धाव घेतली होती. यावर नवऱ्याकडून युक्तिवाद करण्यात आला की न्यायालयात जाण्यासाठी एक वर्षाचा अवधी असतो जो उलटून गेल्यानंतर या महिलेने ही याचिका केली आहे. मात्र नवऱ्याचे म्हणणे न्यायालयाने फेटाळून लावत या महिलेला दिलासा दिला.

तक्रारदार महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की त्यांचं लग्न 18 ऑक्टोबर 2010 रोजी केरळमध्ये झालं होतं. 2013 साली त्यांना मुलगा झाला. गर्भवती असताना आवडीचं जेवण बनवायला न देणे, पोटात लाथ मारणे आणि पूर्वीच्या प्रेयसीसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करणे असले प्रकार तिच्या नवऱ्याने केले होते. या आरोपांचा नवऱ्याने इन्कार केला आहे. तक्रारदार महिलेला सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहायचे होते असा आरोप नवऱ्याने केला आहे.

महानगर न्यायदंडाधिकारी दिपाली कडूसकर यांनी या प्रकरणी आदेश देताना म्हटले की ” बाळाला स्तनपानापासून वंचित ठेवणे हा मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे. उच्च विद्याविभूषषित व्यक्तीकडून त्याच्या बायकोचा छळ केला जाणे हे शोभा देते का? असा सवाल इथे विचारावासा वाटतो.” न्यायालयाने या प्रकरणात तक्रारदार महिलेला दिलासा देताना नवऱ्याला आदेश दिले की त्याने बाळाच्या देखभालीसाठी दर महिना 25 हजार, महिलेला तिच्या देखभालीसाठी महिला 35 हजार आणि घरभाड्यापोटी दर महिना 15 हजार रुपये द्यावेत.