
<<रविप्रकाश कुलकर्णी>>
या सृष्टीचीपण कमाल आहे. इथे क्षणाक्षणाला निसर्ग विभ्रमाचे खेळ इतके होत असतात की, आपल्या दोन डोळ्यात सामावणे आणि बुद्धीला आकलणं कठीणच. मुंबईचे दुर्गप्रेमी विजय महाबळ बाणकोटला कामानिमित्त गेले होते. परतताना चिपळूणला न जाता उलट दिशेने वेळास समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, किनाऱ्यावर आजूबाजूला अंडय़ाची टरफलंच टरफलंच पडली आहेत. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे जाणून कुतूहलापोटी त्यांनी याबाबत किनाऱयावरील लोकांना विचारलं. तेव्हा कळलं ही कासवाच्या अंडय़ाची टरफलं आहेत. त्यांनी आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी तेथूनच चिपळूणचे निसर्ग अभ्यासक भाऊ काटदरेंशी संपर्क साधला.
नंतर महाबळ आणि काटदरे यांनी शोधाशोध करून ही कासवाच्या जन्म सोहळ्याची मोहीम सुरू केली. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च कासवीचा वीण हंगाम असतो. जास्त करून कासवी रात्रीच्या वेळी समुद्रातून किनाऱयावर येऊन वाळूमध्ये खड्डा करते आणि त्यात एका वेळी साधारणपणे 50 ते दीडशे अंडी घालते. नंतर तो खड्डा बुजवून ती परत समुद्रात जाते ती न येण्यासाठी. या अंडय़ांची उबवण नैसर्गिकरित्या होते. पन्नासेक दिवसांनंतर त्यातून एक जीव बाहेर पडून स्वयम शक्तीने खड्डय़ातून बाहेर येऊन तो समुद्राकडे तुरू तुरू चालू लागतो.
कासवाचा हा जन्म सोहळा अनुपम असतो. मात्र दरम्यानच्या काळात किनाऱ्यावरील प्राणी-पक्षांपासून धोका असतो. हे लक्षात घेऊन काटदरे आणि त्यांच्यासारख्या अभ्यासाकांनी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण या संस्थेतर्फे सागरी कासवांचे रक्षण मोहीम सुरू केली. या मोहिमेत एक कार्यकर्ते राम मोने हेदेखील होते आणि पुढे निसर्गातील अनुपम गोष्टींचा पाठपुरावा करायचा छंद त्यांना लागला. हा आनंद आपल्यापुरताच न ठेवता अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते स्लाईड शो, भाषण करू लागले. त्याचीच पुढची पायरी म्हणजे लेखनही करू लागले. अशा निवडक लेखांचे पुस्तक ‘निसर्ग क्षण’ सेवाव्रत मंडळ, चिपळूण यांच्यातर्फे प्रकाशित झाले आहे.
यामध्ये जंगलचा रोपणकार धनेश, मुक्त पाकोळी, कोकणातील झाडे झाडोरा, मुक्त आकाशात विहरणारे पक्षी ज्यात गरुडापासून ते इवल्याशा निवटीपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. आणि अर्थातच कासव जन्म महोत्सव अशा लेखांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या जोडीला सुंदर रंगीत फोटो असल्यामुळे हे पुस्तक अल्हादायक झाले आहे.
या पुस्तकातील पाकोळी संदर्भातील लेख वेधक आहेत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माणसाने पाकोळीलासुद्धा सोडले नाही. त्यासाठी या पक्षाचे हत्याकांड होते ही हकीगत मोरे यांनी इतक्या चित्रदर्शी पद्धतीने मांडली आहे की ते वाचून मन सुन्न होते. त्याबाबत त्यांचे चिंतन आहे… ‘सध्याच्या दिवसांत निसर्गविषयक माहितीचा प्रचार प्रसार पूर्वीच्या तुलनेने बऱयापैकी वाढलेला दिसून येतो. मात्र जो निसर्ग घटक अधिक उपयोगी तितका त्याचा वापर अधिक करण्यात येतो आणि काही वर्षांनी त्याच्यावर अस्तंगत व्हायची वेळ येते. आपल्याएवढाच त्यांनाही जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे या गोष्टीचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे.”
राम मोने यांचे चिंतन नक्कीच विचार करायला लावणारे आहे हे त्यांच्या लेखनाचे यश आहे.































































