
सामना ऑनलाईन, मुंबई
90च्या दशकात साथीदारांसह दरोडे टाकणारा अट्टल दरोडेखोर तब्बल 20 वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. दरोडय़ाच्या गुह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यावर पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार मारतील या भीतीने तो भूमिगत झाला होता. त्याने थेट मामाचे गाव गाठले होते, पण माटुंगा पोलिसांनी त्याला शोधून काढले आहे.
संजय बोधे (51) असे त्या दरोडेखोराचे नाव आहे. 1990-91 मध्ये संजय याने त्याच्या साथीदारांसह अनेक ठिकाणी दरोडे टाकले होते. माटुंगा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात दरोडय़ाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला 90 साली अटक झाली होती. त्या गुह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा कोर्टात हजर झालाच नाही. त्यामुळे 1999 साली कोर्टाने संजयविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत लपून राहत होता. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरार आरोपी शोधून त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे, पोलीस निरीक्षक पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुयाग अमृतकर, अंमलदार सुनील करपे, मंगेश जऱ्हाड हे पथक संजय बोधेचा कसून शोध घेत होते. संजय जोगेश्वरीमध्ये राहत होता. तेथून त्याच्या सातारामधील कोरेगाव तालुक्यात असलेल्या धुदी गावचा पत्ता मिळवला. तेथे दोन तीन वेळा पोलीस जाऊन आले, पण संजय तेथे सापडला नव्हता. अधिक चौकशी केल्यावर संजय त्याच्या साताऱ्यातील क्षेत्रमाऊली या मामाच्या गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी क्षेत्रमाऊली गाव गाठून तेथे राहणाऱ्या संजय बोधेला पकडून आणले.
घाबरून पळालो होतो
90 च्या दशकात गँगवॉर जोरात होते. तेव्हा पोलीस एन्काऊंटरमध्ये गुंड ठार मारले जात होते. पोलीस आपलाही एन्काऊंटर करतील या भीतीने प्रचंड घाबरलो होतो. त्यामुळेच मुंबई सोडून मामाचे गाव गाठले होते असे संजयने चौकशीत सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.































































