
सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने वयाच्या 39व्या वर्षीदेखील फ्रेंच ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या सलामीलाच यजमान फ्रान्सच्या 22 वर्षीय जिओव्हानी पेरिकार्ड याला 5-7, 7-5, 6-1, 6-4 असे चिरडत अनुभवाचा खरा ‘पॉवरगेम’ काय असतो हे दाखवून दिले. याचबरोबर महिला एकेरीत इगा स्विटेकने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत विजयारंभ केला.
सुरुवातीला फ्रेंच प्रेक्षकांच्या आरोळ्या आणि जिओव्हानी पेरीकार्डच्या 223 किमी प्रतितास वेगवान सर्व्हिसमुळे तृतीय मानांकित नोवाक जोकोविच अडचणीत दिसला, पण एकदा लय सापडताच सर्बियन बादशहाने सामना अक्षरशः ताब्यात घेतला. दुसऱ्या सेटमध्ये दहाव्या ब्रेक पॉइंटवर मिळवलेल्या यशानंतर जोकोविचने सामन्याचे चित्रच पालटले. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये त्याने युवा प्रतिस्पर्ध्याची दमछाक करत 2 तास 51 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत विजयश्री खेचून आणली. ‘39व्या वर्षी तीन तास खेळणे म्हणजे डॉक्टरांचा फिटनेस मंत्रच,’ असे म्हणत जोकोविचने मिश्कील टिप्पणीही केली. हा त्याचा विक्रमी 82वा ग्रँडस्लॅम सहभाग ठरला. रॉजर फेडरर आणि फेलिसीनो लोपेझ यांनाही त्याने मागे टाकले. दरम्यान, कार्लस अल्काराज दुखापतीमुळे बाहेर पडल्याने जोकोविचचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. अंतिम फेरीतच त्याची लढत जागतिक अव्वल यानिक सिनर याच्याशी होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूचा धमाका
स्पर्धेत हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन खेळाडू निशेष बसवरेड्डी याने मोठा धमाका केला. त्याने सातव्या मानांकित टेलर फ्रिट्झ याला 7-6, 7-6, 6-7, 6-1 असे नमवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आक्रमक खेळ आणि जबरदस्त बॅकहँडच्या जोरावर निशेषने कारकिर्दीतील पहिला ‘टॉप-10’ विजय मिळवला.
स्वियाटेकचा सहज विजय
महिला एकेरीत चार वेळची विजेती इगा स्वियाटेक हिने ऑस्ट्रेलियाची युवा खेळाडू एमर्सन जोन्स हिचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत सहज दुसरी फेरी गाठली. गतवर्षीची उपविजेती जॅस्मिन पाओलिनी हिनेही विजयी सलामी दिली.



























































