
अनिल मिश्रा । कल्याण
पाऊस म्हणजे खवय्यांकरता नॉन वेजची मेजवानीच असते. पावसात मासेमारी जरी बंद असली तरीही खवय्ये त्याकरता पर्याय शोधून नॉन वेज जेवणाचा आनंद घेताना दिसून येतात. मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसानं सगळ्या खवय्यांच्या जेवणाचे बेतच बदलून टाकले आहेत. ठाणे जिल्ह्यात बऱ्याच भागात पहिला पाऊस जोरदार झाला त्यामुळे बाजारात खेकड्यांच्या टोपल्या दिसू लागल्या आहेत.
कल्याण- कसारा- मुरबाडच्या डोंगराळ भागात आदिवासी समाजाची घरं आहेत. तेथील आदिवासी महिला पावसाळ्यात डोंगराळ भागात सापडणाऱ्या खेकड्यांची विक्री करताना बाजारात दिसून येतात. येथे डोंगराळ भागात मिळणाऱ्या खेकड्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चव. पावसात मिळणाऱ्या या खेकड्यांची चव जेवणाला भलतीच रंगत आणते. खेकडा खाणाऱ्या खवय्यांची गर्दी कल्याणमधील बाजारात सध्या दिसून येत आहे. या आदिवासी महिला खेकड्यांची किंमत ही एका टोपलीतील सर्व खेकड्यांच्या वजनानूसार ठरवतात. या भागात मिळणारे खेकडे हे काळ्या, पांढऱ्या व लाल रंगाचे असून त्यांच्या विविध जाती येथे पाहायला मिळतात.
बाजारात खेकडे विकायला घेऊन येणाऱ्या या आदिवासी महिला टोपलीच्या भावाने खेकडे विकतात. त्यामुळं या खेकड्यांची त्यांना चांगलीच किंमत मिळते. प्रतिदिन या महिलांची खेकडे विकून होणारी कमाई ही दोन हजार रुपयापर्यंत आहे. खरं तर इतर वेळी बाजारत नदीतले, तळ्यातले किंवा समुद्राच्या ठिकाणचे खेकडे बाजारात विकायला असतात. मात्र पावसाळ्यात मिळणाऱ्या या डोंगरी खेकड्यांची चव काहीशी अनोखी असल्यानं लोक जास्त किंमतीत ही या खेकड्यांची खरेदी करतात.



























































