
प्रशासकीय बदली धोरणातून परिचारिकांना वगळण्यात यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले असून 20 मेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार परिचारिकांनी केला आहे.
12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि यादरम्यान परिचारिका सप्ताह मोठय़ा उत्साहात पार पडतो, परंतु या वर्षी शासनाने परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू केल्यामुळे संपूर्ण परिचारिका तणावाखाली आहेत. परिचारिका संवर्गात तब्बल 90 टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्या तिन्ही पाळय़ांमध्ये रुग्णसेवा देत आहेत, मात्र प्रशासकीय बदल्यांमुळे या परिचारिका पेचात अडकल्या आहेत. त्यांच्या कौटुंबिक जीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. परिचारिकांवर कोणताही आर्थिक कार्यभाराचा प्रभार नसतो. त्यांची दर तीन वर्षांनी कक्षांतर्गत बदली होत असते. त्यामुळे त्यांना प्रशासकीय बदली धोरणातून कायमचे वगळून केवळ विनंती व तक्रार आधारित बदल्या कराव्यात, अशी परिचारिकांची मागणी आहे.
या आहेत अन्य मागण्या
कोविड-19 महामारीच्या काळात स्वतःच्या पुटुंबाचा त्याग करून रुग्णसेवा देणाऱ्या या घटकाचे सेवाप्रवेश नियम आणि पदोन्नती वर्षानुवर्षे रखडलेली आहे. तसेच गेल्या 40 वर्षांत त्यांच्या भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. या प्रलंबित मागण्यांकडे आणि अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले असून, शासनाने परिचारिकांना सक्षम करून न्याय द्यावा, असे आवाहन संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे, राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी केले.


























































