ठसा – जयंत एडनवाले

>> श्रीकांत आंब्रे

ज्येष्ठ संगीतकार जयंत एडनवाले यांचे निधन झाले. या बातमीने अनेकांना धक्का बसला असेल. वय 83 असले तरी त्यांचा उत्साह, चालणे-बोलणे आणि वाद्यांवरची हुकूमत शेवटपर्यंत अगदी उत्साही तरुणासारखी होती. म्हणूनच गीतांना चाली देताना, माऊथ ऑर्गन वाजवताना आणि टेबल टेनिस खेळताना त्यांच्यातील ऊर्जा त्यांच्या उंचपुऱया देहयष्टीला, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा बाज देत असे. संगीत विश्वात रमणारे एडनवाले आयकर भवनात स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस लागले आणि आयकर खात्याच्या पदोन्नतीच्या अनेक परीक्षा देऊन आयकर उपायुक्त झाले.

नोकरीत असताना एम.कॉम, एल.एल.बी. करून ते या उच्च पदावर पोहोचले. ही त्यांच्यातील जिद्दीची पावती होती. एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांत टेबल टेनिस खेळणे आणि तिसरीकडे संगीत क्षेत्रात नाटक, सिनेमा, ध्वनिफिती यांना संगीत देणे या साऱया गोष्टी ते इतक्या सहजपणे करीत याचे अनेकांना आश्चर्य वाटत असे. अतिशय नम्र स्वभाव, निगर्वीपणा आणि दुसऱयाला सांभाळून घेण्याची वृत्ती यामुळे नोकरीत, संगीत क्षेत्रात आणि खेळात त्यांच्या मनमिळावू वृत्तीचे प्रत्यंतर येई.

त्या काळात मीनल गुप्ता, पंचमदा (आर. डी. बर्मन) यांनी माऊथ ऑर्गन (हार्मोनिका) वादनात जान आणली होती. त्यानंतरच्या काळात उत्तमरीत्या हार्मोनिका वादन करणारे जे मोजके कलाकार होते त्यात जयंत मोरेश्वर एडनवाले अग्रगण्य हार्मोनिका वादक होते.

बालपणी आईने मोतमाऊलीच्या जत्रेत विकत घेऊन दिलेल्या तीन रुपयांच्या माऊथ ऑर्गन (बाजा) या वाद्यावर त्यांनी इतकी हुकूमत मिळवली की पुढे ते अनेक हिंदी फिल्मी गाणी त्यातील संगीत सुरावटीसकट अप्रतिम वाजवत. पुढे या वाद्याला हार्मोनिका हे नाव पडले. त्याचे स्वतंत्र कार्यक्रम ते करू लागले. त्यांच्या हार्मोनिका गाण्याच्या अनेक कॅसेटस् प्रकाशित झाल्या.

कवी शांताराम नांदगावकर यांनी प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण यांच्याशी त्यांची ओळख करून दिली तेव्हा त्यांचे माऊथ ऑर्गन वादन ऐकून तेही अवाक् झाले. त्यांनी त्यांना आपल्या वादकांच्या ताफ्यात घेतलेच, परंतु ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटांत काही भावपूर्ण प्रसंगांत त्यांना स्वतंत्र माऊथ ऑर्गन वादनाचे दीर्घ पीस दिले. चित्रपटातला तो महत्त्वाचा भाग होता. त्यांच्या या वादनावर राजाबाबू आणि ताराचंद बडजात्या मनापासून खूश झाले आणि त्यांचे मनापासून कौतुक केले.

लतादीदींच्या ‘श्रद्धांजली’ या कॅसेटमध्ये त्यांना माऊथ ऑर्गन वादनाची संधी संगीतकार अनिल मोहिले यांच्यामुळे मिळाली. दूरदर्शनवरील 12 नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले. रत्नाकर मतकरींच्या ‘साटेलोटे’ या व्यावसायिक नाटकाला त्यांनी पार्श्वसंगीत दिले. मुंबई दूरदर्शनवरील ‘सप्रेम नमस्कार’, ‘ज्ञानदीप’, ‘मागोवा’, अश्वमेध, ‘बॅगीसाहेब’, ‘संग्राम’ या टी.व्ही. मालिकांचे शीर्षक गीत त्यांनी तयार केले.

‘कोंकणी भाषिक गोवन मसाला’ तसेच ‘सूर्योपासना’, ‘विघ्नविनाशक मोरया’, ‘हा नवरा गालात हसला’, ‘मंगल दर्शन गजवदना’, ‘ओंकार गणराया’, ‘सगळे सारखे’, ‘सिद्धिविनायक ब्रेथलेस’ इत्यादी अनेक कॅसेटस्ना त्यांनी संगीत दिले. ‘अनोखा अंदाज’ या चित्रपटातलाही अमर हळदीपूर यांच्याबरोबर त्यांना पार्श्वसंगीत देण्याची संधी मिळाली. त्यांच्या स्वतःच्या माऊथ ऑर्गन वादनाची ‘गोल्डन हिटस् ऑफ हार्मोनिका’ व इतर कॅसेटस्ही लोकप्रिय ठरल्या. त्यांनी संगीतबद्ध केलेली व नेहा राजपाल आणि सौरभ श्रीवास्तव यांनी गायलेली ‘शंभो शिवनाथा’ ही हिंदी गाण्यांची सीडीही गाजली. त्याशिवाय ‘ले चल मेरे संग’, ‘प्रेमशक्ती’, ‘ऐसा क्यू’, ‘वर्तमान’, ‘प्यार का तराना’ इ.

हिंदी गाण्यांच्या कॅसेटस्नाही त्यांनी संगीत दिले. ‘शीशा’ ही टी.व्ही. मालिकाही केली. भक्तिगीते, भावगीते, लग्नगीते यांसारख्या अनेक ढंगाच्या शेकडो गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केले. सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकरपासून उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर-पेठे यांच्यापर्यंत अनेक गुणी गायक-गायिकांनी त्यांनी संगीत दिलेली गाणी गायली.

‘स्वरमल्हार’ हा त्यांचा वाद्यवृंदही लोकप्रिय होता. सरकारी अधिकारी पदापासून क्रीडा आणि संगीतापर्यंत विविध क्षेत्रांत चौफेर कामगिरी करणारा हा कलावंत कुणाच्याही पुढे पुढे न करता आपल्या शिस्तीत जीवन जगला आणि नेहमीच दुसऱयांना प्रोत्साहन देता देता स्वतः अचानक निघून गेला.

आपली प्रतिक्रिया द्या