ठसा – कॉ. रोझा देशपांडे

>> कॉ. प्रकाश रेड्डी  

कॉ. रोझा देशपांडे यांच्या निधनाने देशाच्या इतिहासाच्या ध्येयवेड्या, क्रांतिकारी पिढीचा एक प्रतिनिधी आपल्यातून गेला आहे. रोझा देशपांडे या ज्येष्ठ कामगार नेते कॉ. श्रीपाद डांगे यांच्या कन्या.

रोझा देशपांडे यांचा जन्म 1928 साली झाला. 1928 व 1929 हे वर्ष देशाच्या इतिहासात वादळी ठरले आहे. 1928 साली देशभरात कामगारांचे 200 संप झाले. त्यात मुंबईचा गिरणी कामगार आघाडीवर होता. 1928 साली मुंबईत गिरणी कामगारांनी 6 महिन्यांचा ऐतिहासिक संप कॉ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली केला.

यामुळेच रोझा यांच्या लहानपणीच्या 1928, 1929 व नंतरच्या काळातही तिचे वडील कॉ. डांगे सतत तुरुंगाच्या आतबाहेर असत. पण कामगारांचा संघर्ष चालूच असे. रोझा यांच्या आई उषाताई रोझा यांना गिरणीच्या गेटमीटिंगला जाताना सोबत घेऊन जात. बालपणापासून आलेल्या कामगारांच्या संपर्कामुळे रोझ यांची विचारसरणी आकार घेत होती. त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत व नंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रोझा या नावातच क्रांतिकारत्व आहे. हे नाव स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्य़ा व हिटलरच्या फॅसिझमला टक्कर देणाऱ्य़ा जर्मन कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकाचे आहे. कॉ. डांगेंनी हे नाव ठेवले व रोझा यांनी ते सार्थकी लावले. रोझा व  कॉ. डांगेंचे नाते वडील व मुलगी असे होते, तसेच राजकीयही होते. कॉ. डांगेंचा उल्लेख त्या ’डी’ असा  करीत असत. कॉ. डांगेंवर बरीच वर्षे कष्ट करून एक पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. रोझाताई या स्वतः कामगार नेत्या होत्या. त्या आयटक या कामगार संघटनेच्या राष्ट्रीय खजिनदार होत्या व डब्लूएफटीयू या जागतिक कामगार संघटनेच्या सदस्या होत्या. त्यांनी औषधी कामगारांना संघटित केले व त्यांना आयटक संलग्न ऑल इंडिया फार्मास्युटिकल एम्प्लॉईज युनियन या संघटनेत आणले.त्या काळी छोटय़ा मोठय़ा 64 औषधी कंपन्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली युनियन होती. त्यात जॉन्सन ऍण्ड जॉन्सन, बरोज केमिकल, जे. एल. मॉरिसन ही नावे घ्यावी लागतील.

बाळंतपणाची रजा

औषधी कंपन्यांमध्ये महिला मोठय़ा प्रमाणात होत्या. पण गरोदर राहिल्यावर त्यांना रजा न देता कामावरून काढून टाकले जाईल. रोझाताईंनी याविरोधात संघर्ष केला व महिलांसाठी बाळंतपणाची रजा मंजूर करून घेतली. त्यांचा वेशेष उल्लेख करणारा लढा म्हणजे इण्डस्ट्रिअल ऍण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट प्रा. लि. ही मालकाने बुडवलेली कंपनी त्यांनी ताब्यात घेऊन चालवली. ही कंपनी टॅबलेट, सिरप इत्यादी बनवत असे. ती मालक बंद करू इच्छित होता. रोझाताईंनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. 1973 ते 1991 पर्यंत ही कंपनी कामगारांनी चालवून दाखवली. त्यात 100 कामगार होते. त्यातलेच एक कामगार अशोक पाटकर हे संचालक बनले.

रोझा देशपांडे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार म्हणून दक्षिण-मध्य मुंबईमधून 1974 साली निवडणूक लढवली. ही निवडणूक गाजली. त्याला कामगारांच्या 42 दिवसांच्या संपाची पार्श्वभूमी होती. काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांचा पराभव करून त्या निवडून आल्या. त्यांच्या भाषणांनी गिरणगावात चैतन्य पसरत असे. छोटी छोटी वाक्ये, भाषणातून संवाद साधणे व प्रभावी राजकारण यातून त्या सभा गाजवत असत. सरकारने त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी एक समिती गठित केली होती. अनेक आंदोलकर्त्यांचा सत्कार त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील रवींद्र नाटय़मंदिरात करण्यात आला. रोझा देशपांडे यांनी नंतर कॉ. डांगे यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. अखेरच्या काळापर्यंत त्या सक्रिय होत्या. काही काळ त्यांनी व त्यांचे पती बानी देशपांडे यांनी लेखन करण्यात घालवला. विसाव्या शतकातील स्वातंत्र्य चळवळ, कामगार लढे, महिला हक्क, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, स्वातंत्र्यानंतरच्या संसदीय लोकशाहीमधील सहभाग हे पाहिलेले व्यक्तिमत्व म्हणून रोझा देशपांडे यांचा उल्लेख करावा लागेल. त्या ध्येयवादी पिढीच्या प्रतिनिधी म्हणून रोझा देशपांडे कायम स्मरणात राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या