अश्लील मेसेजप्रकरणी दोन भामटे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
face-book

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग

बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून महिलांना अश्लील संदेश पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील एकाला बांदा उभाबाजार येथून तर दुसऱ्याला आंब्रड (कुडाळ) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून जिल्ह्यातील महिलांना अश्लील संदेश पाठविणे, त्यांच्याशी अश्लील संभाषण करणे, तसेच त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारची जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी गंभीर दखल घेत अशा गुह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक तयार केले होते. या पथकाने विशेष अभ्यास करत माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत निवती पोलीस ठाणे व मालवण पोलीस ठाणे मध्ये दाखल गुह्यांमधील आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीता कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, कृष्णा केसरकर, रवि इंगळे, अमित तेली, प्रथमेश गावडे, भक्ती सावंत यांनी केली.

…तर नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या

जर आपल्याला अशा प्रकारे अश्लील संदेश येत असतील तसेच अश्लील संभाषण करून कोण त्रास देत असल्यास महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात जावून तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.