प्रवीण दराडे यांना मुंबईबाहेर हलवले,ब्रिजेश सिंग स्वगृही; सरकारची नवी टीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि मंत्रालयात महत्वाच्या पदावर ठाण मांडून बसलेल्या सनदी अधिकाऱ्यांना बदलून महाविकास आघाडी सरकारने नवी टीम तयार केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी असणारे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांना मुंबईबाहेर हलविण्यात आले असून त्यांच्या जागी पी. वेलरासू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी असताना राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रिजेश सिंग यांना स्वगृही म्हणजे त्यांच्या मुळ विभागात परत पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील 22 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे या पदावर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू लक्ष्मी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विक्रीकर आयुक्त शैला ए. यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी या पदावर करण्यात आली आहे.

वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक जे. मुखर्जी यांची बदली अपर मुख्य सचिव अल्पसंख्याक या पदावर करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी कार्यरत एस.ए. तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव वस्त्रोद्योग या पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी वेणुगोपाल रेड्डी यांची बदली वन विभागाच्या प्रधान सचिव पदावर करण्यात आली आहे.

सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा या पदावर करण्यात आली आहे. आयुक्त मृद व जलसंधारण (संभाजीनगर)दीपक सिंगला यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली या पदावर करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर या पदावर करण्यात आली आहे.

सोलापुरचे जिल्हाधिकारी आर बी भोसले यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत कितरण कंपनी या पदावर करण्यात आली आहे. नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पदावर करण्यात आली आहे. मदन नागरगोजे यांची बदली मंत्रालयात संचालक माहिती व तंत्रज्ञान या पदावर करण्यात आली आहे.

डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे या पदावर करण्यात आली आहे. आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर तर भुवनेश्करी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदावर करण्यात आली आहे.

के. गोविंदराज ‘एमएमआरडीए’त, संजीवकुमार विक्रीकर आयुक्त
वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के एच गोविंदराज यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर करण्यात आली आहे. तर संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत कितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर या पदावर करण्यात आली असून त्या ठिकाणी कार्यरत राजीव जलोटा, यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास या पदावर करण्यात आली आहे. असीम कुमार गुप्ता यांची नियुक्ती प्रधान सचिव ऊर्जा या पदावर करण्यात आली आहे.