उतारवयात कलाकारांना मिळणार आधार, कर्जतमध्ये कलाकारांसाठी वृद्धाश्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

अनेक कलाकारांना त्यांच्या उतारवयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काहींना तर शेवटच्या क्षणी राहायला घर नसते. अशा कलाकारांच्या मदतीसाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने पुढाकार घेतला आहे. अशांसाठी विशाखा लवकरच कर्जतमध्ये वृद्धाश्रम उभारणार आहे.

याबाबत विशाखा म्हणाली, जेव्हा काही वृद्ध कलाकार वाईट अवस्थेत दिसले तेव्हापासून डोक्यात गेली काही वर्षे असा विचार डोक्यात घोळत होता. एकदा वय व्हायला लागले की आधारासाठी पटकन कोणी उभे राहत नाही. तेव्हा कलाकारांसाठी वृद्धाश्रम असावा हा विचार डोक्यात आला. एकटेपणा दूर व्हावा या कल्पनेतून एकटय़ा पडलेल्या वृद्ध कलाकार मित्र- मैत्रिणींसाठी एक कलाश्रय सुरू करण्याचा विचार आहे.

कर्जतमधील संस्थेने स्वामीधाम मोग्रज आनंदवाडी येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिली आहे त्यावर हे वृद्धाश्रम उभे राहणार आहे. 6 एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे उद्घाटन आहे. त्याचवेळी वृद्ध कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱया या वृद्धाश्रमाचा श्रीगणेशा होणार आहे, असे विशाखा यांनी सांगितले.