मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, राहुरी

आग्या मोहळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील वयोवृद्ध वक्ती ठार झाली आहे. वरवंडी येथील यात्रा असल्याने बापू मुक्ताजी पंडीत (65) हे मोपेड मोटरसायकलवरून गावात यात्रेला चालले होते. गावातील कदम दूध संकलन केंद्राच्या रस्त्यावर आले असता आग्या मोहळाच्या शेकडो मधमाशांनी पंडीत यांच्यावर अचानक हल्ला चढविला.

यावेळी रस्त्याने जाणाऱ्या विलास मुरलीधर गायकवाड, सरकार भारत साळवे, गणेश साळवे, भानुदास शिंगाडे या ग्रामस्थांना देखील मधमाशांनी चावा घेतला. मात्र हे ग्रामस्थ जीवाच्या भीतीने पळाल्याने पुढील अनर्थ टळला.दरम्यान मधमाशाच्या अचानक झालेल्या हल्ल्याने पंडीत गंभीर जखमी झाले. हल्ला करणाऱ्या मधमाशांची मोठी संख्या पाहून पुढे जाण्याचे धाडस कुणीही केले नाही. अखेर विजय राजाबापू कदम, विजय केशव अडसुरे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पंडीत यांची मधमाशांच्या तावडीतून सुटका करून उपचारासाठी राहुरी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच बापू पंडीत यांची प्राणज्योत मालवली.