वेत्ये समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाची 113 अंडी सुरक्षित; कासवमित्राचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी सापडली होती. आता याच समुद्रकिनारी पुन्हा ऑलिव्ह रिडले कासवाची 113 अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनार्‍यावर घरटे बनवत योग्यपद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. त्यातून वेत्ये समुद्र किनार्‍यावरचे यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्याचे दुसरे घरटे सुरक्षित झाले आहे.

राजापूर तालुक्याच्या वेत्ये, आंबोळगड समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येत आहे. मात्र, यावर्षीचा अवकाळी पाऊस आणि बदललेले वातावरण यामुळे कासवाची मादी उशीरा अंडी घालण्यासाठी येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच वेत्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी आढळली होती. त्यावेळी वेत्ये किनारी यावर्षीचे कासवाच्या अंड्यांचे पहिले घरटे झाले. त्यानंतर आंबोळगड समुद्र किनारीही कासवाची अंडी आढळून आली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा वेत्ये समुद्र किनारी कासवाची अंडी आढळून आली आहेत. ती घरटे बांधून सुरक्षित करण्यात आली आहेत.

वेत्ये समुद्रकिनारी गेली काही वर्षे कासवाच्या अंड्यांचे संवर्धन करण्यासाठी कासवमित्र जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पहाटेच्यावेळी समुद्रकिनारी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्यांना वाळूमध्ये कासवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या पावलांच्या ठशांचा माग काढत त्यांनी पाहणी केली असता त्यांना कासवाची अंडी आढळली. याबाबत त्यांनी तात्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनार्‍यावरील वन्य प्राणी वा जंगली श्‍वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे. त्यातून वेत्ये किनारी यावर्षीचे कासवांच्या अंड्याचे दुसरे घरटे सुरक्षित करण्यात आले आहे. या अंड्यामधून आता सुमारे पंचावन्न दिवसांनी पिल्ले बाहेर येणार असून त्यानंतर या इवल्याशा कासवाच्या पिल्लांचा समुद्रप्रवास अनुभवण्याची संधी पर्यटकांसह ग्रामस्थांना मिळणार आहे.