ओमर यांच्या नजरकैदेसंबंधी सुनावणीपासून न्यायमूर्तींची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
omar-abdullah

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या पीएसए कलमाच्या विरोधात त्यांच्या बहिणीने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहन एम. शांतानागौडार यांनी बुधवारी आपले अंग काढून घेतले. उमर अब्दुल्ला यांची बहीण सारा पायलट यांनी दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती शांतानागौडार आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुरू होणार होती. मात्र शांतानागौडार यांनी सुनावणीतून माघार घेतल्यामुळे या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीतून आपण का माघार घेत आहोत याबाबत मात्र शांतानागौडार यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. खटल्याच्या सुरुवातीलाच त्यांनी आपण या प्रकरणाची सुनावणी करणार नाही, असे सांगितले होते.