
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत पालिकेच्या सुरू असलेल्या ‘कोरोना लढय़ा’त 259 कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आतापर्यंत 7068 जणांना कोरोनाची लागण झाली असून 6529 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याने लढा आणखी तीव्र होणार आहे.
मुंबईत 11 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. शेकडो कोरोना हॉटस्पॉट निर्माण झाले. त्यामुळे देशभरात 23 मार्च 2020 पासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशा वेळी सर्व यंत्रणा-आस्थापना, खासगी कार्यालये-कारखाने, उद्योग बंद असताना पालिकेचे सुमारे सवा लाख कर्मचारी मुंबईकरांच्या सेवेत अहोरात्र झटत होते. मात्र हे करीत असताना पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये ‘अ’ वर्ग दर्जाचे 4 अधिकारी, ‘ब’ वर्गाचे 13, ‘क’ वर्ग 44 कर्मचारी आणि ‘ड’ वर्गातील सर्वाधिक म्हणजे 198 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
18 दिवसांत 172 जणांना लागण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे स्पष्ट संकेत मिळत असताना वाढलेल्या रुग्णसंख्येत गेल्या 18 दिवसांत पालिकेच्या 172 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 17 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत मुंबईत तब्बल 67 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.























































