
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या मुंबई युनिटने रविवारी नागपाडा परिसरात कारवाई करून एका महिलेला अटक केली. हुसेन बी. असे तिचे नाव असून तिच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचे हशिश जप्त केले. जम्मू-कश्मीर येथून हशिश आणून ती नागपाडय़ात विकत होती.
‘एनसीबी’ मुंबई युनिटने शहरात ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. गेल्या महिन्यात झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने भिवंडीच्या पडघा येथील अर्जुन अली टोल प्लाझा येथे सापळा रचून शबीर उस्मान शेख आणि अहमद ताझाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या दोघांकडून ‘एनसीबी’ने 12 किलो चरस जप्त केले होते. चरसची तस्करी केल्याप्रकरणी त्या दोघांना ‘एनसीबी’ने अटक केली होती. ‘एनसीबी’ कोठडीदरम्यान त्या दोघांनी ते चरस कश्मीर येथून आणल्याचे ‘एनसीबी’ला सांगितले होते. तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचे नाव समोर आले होते. त्यानंतर ‘एनसीबी’ने इक्बाल कासकरची दोन दिवस चौकशी केली होती. इक्बालच्या चौकशीनंतर ‘एनसीबी’ला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
नागपाडा परिसरात एक महिला ही हशिशची तस्करी करत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने रविवारी नागपाडय़ात कारवाई करून हुसेन बी. या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ‘एनसीबी’ने एक कोटी रुपये किमतीचे हशिश जप्त केले. तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
तस्करीसाठी करायची मुलाचा वापर
हुसेन बी. ही गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जच्या धंद्यात आहे. ती पेडलरला ड्रग्ज देण्यासाठी लहान मुलाचा वापर करत असायची. पोलीस लहान मुलांना पकडत नाहीत हे तिला माहीत होते. लहान मुलांचा वापर ड्रग्ज डिलिव्हरीसाठी केल्याप्रकरणी ‘एनसीबी’ने त्या मुलाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


























































