भरधाव टँकरची रिक्षाला धडक; अपघातात 6 जण ठार, 3 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

भरधाव टँकरने रिक्षाला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. तेलंगणाच्या संगारेडी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ही घटना घडली. सतवार गावाच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा यू-टर्न घेत असताना टँकरने तिला धडक दिली. रिक्षातील सर्व मयत आणि जखमी रोजंदारीवर काम करणारे मजूर होते.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील राजगीरा येथील रहिवासी असलेले मजूर रोजंदारीचे काम आटोपून गावी परतत होते. यादरम्यान भरधाव टँकरने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना झाहिराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य सुरू केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.