
सुधीर नागापुरे, माजलगाव
माजलगाव धरणात धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोन मुलांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. शहरालगत असलेल्या रेनापुरी येथील ही महिला धरणात कपडे धुण्यासाठी मुलगा, भाचीसह गेली होती. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाला.
माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी एक महिला व तीन-चार बालके गेली होती. शेख सोहेल शेख नजीम (11) हा पाण्यात खेळत असताना थोडा पुढे गेला व पाण्यात बुडू लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याची मावस बहीण शेख तबु शेख गफार (14) हिने पाण्यात उडी घेतली. पण भावाला वाचवण्याऐवजी तीच पाण्यात बुडू लागली. हे पाहून सोहेलची आई शेख नसू शेख नामु (30) ही देखील पाण्यात उतरली. पाणी खोल असल्याने व तिला पोहता येत नसल्याने तीदेखील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली.
आजूबाजूला असलेल्या काही मंडळींनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी अनेक जण जमले. या तिघांना बाहेर काढण्यात आले तोपर्यंत ते तिघे मृत झाले होते. शेख नसू ही माजलगाव शेजारी असलेल्या भाटवडगाव येथील शेख मोहम्मद यांची कन्या आहे. ती दोन दिवसापूर्वीच संभाजीनगर येथून कुटुंबास भेटण्यासाठी आली असताना तिच्यावर मृत्युने घाला घातला.






























































