पालिका कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या पगारात मिळणार अंतरिम वेतनवाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-building

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पालिकेच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू होणार असून फेब्रुवारीच्या पगारात अंतरिम वेतनवाढ दिली जाणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत कामगार समन्वय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ मार्च-एप्रिलपासून मिळणार असून अंतरिम वेतनवाढीमध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ यांची एकूण रक्कम मे महिन्यात 50 टक्के मिळणार असून फेब्रुवारीपासून अंतरिम वेतनवाढ मिळणार आहे.

कामगार समन्वय समिती आणि पालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक
गुरुवारी पार पडली. या बैठकीत यशस्वी वाटाघाटी झाल्या असून पुढील कार्यवाहीबाबत पुन्हा 18 फेब्रुवारी रोजी बैठक होणार असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. यावेळी कामगार समन्वय समितीचे ऍड. प्रकाश देवदास, ऍड. महाबळ शेट्टी, ऍड. सुखदेव काशिद, बा. शि. साळवी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, सुभाष पवार, दिवाकर दळवी, साईनाथ राजाध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर उपस्थित होते.

या मागण्या पूर्ण होणार

  • सातव्या वेतन आयोगासंदर्भात 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत गेड पे 1995-2000 च्या जुन्या वेतन श्रेणीच्या कमाल टप्प्यावर येणारी रक्कम 100 च्या पटीने परिवर्तित करून आलेली रक्कम व ग्रेड पे त्यापेक्षा कमी असू नये यासाठी समन्वय समिती आग्रही राहील.
  • सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे. गटविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आणि बायोमेट्रिक प्रश्न सोडवणे.