दिल्लीतील किसान मार्चमध्ये देशभरातून एक लाख शेतकरी होणार सामील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी नवी दिल्लीत 29 व 30 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे चार किसान मार्च निघत आहेत.देशभरातून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 180 संघटनांच्या सहभागातून एक लाख शेतकरी किसान मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने किसान मार्चसाठी देशभरातून वीस हजार शेतकरी रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली 5 हजार शेतकरी दिल्ली मार्चसाठी रवाना झाले आहेत.दिल्ली येथे होणाऱ्या किसान सभेच्या रॅलीमध्ये नगर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. या रॅलिसाठी नगर जिल्ह्यातील शेतकरी हजारोच्या संख्येने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, शेतकरी पेंशन, दुष्काळ, विमा, जमिनीचे हक्क आदी शेतकरी प्रश्न या किसान मार्चमध्ये उपस्थित केले जाणार आहेत.नेशन फॉर फार्मर्स या बुद्धिजीवी, विचारवंत, व्यावसायिक, पत्रकार, लेखकांच्या मंचने किसान मार्चसाठी समर्थन दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चेसाठी संसदेचे स्वतंत्र सत्र आयोजित करावे अशी मागणीही किसान मार्चमध्ये करण्यात येणार आहे.देशभरातील शेतकरी दिल्लीच्या चारही रस्त्यांवर बुधवारी रात्री पोहचतील. गुरुवारी 29 नोव्हेंबर रोजी 11 वाजता चारही बाजुंनी किसान मार्च सुरू होतील. सायंकाळी 6 वाजता ते रामलीला मैदानात पोहचतील. रामलीला मैदानात एक शाम किसान के नाम हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी रामलीला मैदानातून संसदेकडे मार्च निघेल. दुपारी संसद मार्ग येथे पोहचल्यावर किसान संघर्ष समन्वय समितीचे नेते मार्चला संबोधित करतील. किसान मार्चचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांचे नेते दुपारच्या सत्रात मार्चला संबोधित करतील.