
औसा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या आनंद माणिकराव कुलकर्णी याला एक हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. औसा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या प्रकरणातील तक्रारदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय औसा येथे जमिनीच्या मोजणीसाठी अतितातडीचे मोजणी शुल्क भरले होते. मोजणीची तारीख लवकर मिळवून देण्यासाठी या कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक म्हणून काम करणारे आनंद माणिकराव कुलकर्णी यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी सापळा लावण्यात आला. एक हजार रुपयांची लाच स्विकारताना कुलकर्णीला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार दराडे करत आहेत.


























































