युवतीला ब्लॅकमेल करत लॉजवर घेऊन जाणाऱ्याला अटक; निर्भया पथकाची साताऱ्यात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया युवतीला मोबाईलवर अश्लील मेसेज करून तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाणाऱयाला निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहे. अक्षय रमेश मदने (वय 25, रा. राजापूर, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे.

अक्षय मदने या युवकाने संबंधित युवतीला 30 जून रोजी तिच्या मोबाईलवर मेसेज करत ‘तुझे माझ्याकडे व्हिडीओ आहेत. ते डिलीट करायचे असतील, तर तू माझ्याबरोबर एक तास लॉजवर यायचं, नाही आलीस तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’, असे मेसेज करत धमकावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या युवतीने निर्भया पथकास माहिती सांगून तक्रार अर्ज दिला.

या घटनेची माहिती सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित युवतीला तिच्या मोबाईलवरून त्या युवकास मेसेज कर, असे सांगत भेटण्यास सांगितले. संबंधित युवकाने युवतीला थेट लॉजवर जाण्याचा आग्रह धरला. तिला दुचाकीवर बसवून तो जिल्हा न्यायालयाच्या आवारात आला असता निर्भया पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संबंधित युवतीने त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. निर्भया पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगदपणे जाळय़ात अडकला.