
मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अभिजीत तुकाराम येलवांडे (वय 24 , रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार नकुल श्याम खाडे, चेतन चंद्रकांत पवार, उमेश चिकणे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
बांधकाम ठेकेदारावर गोळीबार करणारा सराईत आरोपी वारजेतील गोसावी वस्ती परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस नाईक राजेंद्र लांडगे आणि नितीन रावळ यांना मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने आरोपी अभिजीतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला मित्र दीपक सोनवणे याचा 2013 मध्ये खून झाला होता. त्या खूनामागे तक्रारदार रविंद्र तागुंदे असल्याचा आपल्याला संशय होता. त्यामुळे मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी रविंद्र याला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली अभिजीतने दिली आहे.
पुढील कार्यवाहीसाठी त्याला वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे, नितीन रावळ, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांच्या पथकाने केली.

























































