
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेला डमी उमेदवार बसवून एका तरुणाने सरकारी नोकरी लाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गंभीर म्हणजे हा तरुण एमपीएसीच्याच कार्यालयात दोन वर्षे कार्यरत होता. टायपिंग येत नसल्याने त्याची बोगसगिरी उघड झाली आणि तो गजाआड झाला. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संभाजीनगरमधून त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
राज्यसेवा आयोगामार्फत 2016-17 या वर्षात कारकून आणि टायपिस्ट या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला मनोज हा तरुण 2017 मध्ये राज्यसेवा आयोगाच्याच मुंबई येथील कार्यालयात रुजू झाला. त्याने सरकारी नोकरी पटकावली, पण त्याला टायपिंग येत नव्हते. शिवाय इतरही कामे त्याला करता येत नसल्याचे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या लक्षात आले. त्यामुळे संशय आल्याने या अधिकाऱयांनी आपल्या विभागामार्फत चौकशी केली. त्यावेळी मनोजने सादर केलेली कागदपत्रे, परीक्षेच्या वेळी दिलेला फोटो यात काही प्रमाणात तफावत असल्याचे आढळून आले. ही परीक्षा मनोजने माटुंगा येथील केंद्रात दिल्याने राज्यसेवा आयोगाच्या अधिकाऱयांनी माटुंगा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. या तक्रारीवर प्राथमिक तपास केल्यानंतर मनोजने डमी उमेदवार परीक्षेसाठी बसवल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संभाजीनगर येथील घरातून मनोजला अटक केली. मनोजने डमी म्हणून ज्या तरुणाला परीक्षेला बसवला होता त्याचा पोलीस शोध घेत आहेत.



























































