पालघर जिह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी; वृद्धाचा बंधाऱ्यावरून पाय घसरून मृत्यू

24

सामना ऑनलाईन । वाणगाव (डहाणू)

पालघर जिह्यातील भीषण पाणीटंचाईने पहिला बळी घेतला. जव्हारपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळकापरा येथील एका वृद्धाचा पिण्याचे पाणी घेऊन परतत असताना बंधाऱ्यावरून पाय घसरून पडून मृत्यू झाला. यशवंत जानू सावर (54) असे या दुर्दैवी मृताचे नाव आहे.

बाळकापरा हे गाव मोठय़ा शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणापासून हाकेच्या अंतरावर (फक्त दोन किलोमीटर अंतरावर) आहे. या गावातील यशवंत जानू सावर हे पिण्याचे पाणी घेऊन घरी परतत असताना गावाजवळील कोरडय़ा बंधाऱ्यावरून पाय घसरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

पालघर जिह्यातील जव्हार आणि विक्रमगड, मोखाडाला दुष्काळाच्या मोठय़ा झळा बसत आहेत. नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून  पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. टँकरने होणारा पाणीपुरवठाही नियमित व पुरेसा नसल्याने येथील नागरिकांना अतोनात कष्ट सहन करून रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी झटावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या