एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा चाकूने भोसकून खून; विषप्राशन करून आरोपी  पोलीस ठाण्यात हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी शिकवणीसाठी गेलेल्या अकरावीतील विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने भोसकून खून केला आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु. येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर विष प्राशन करून आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्यावर कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याविरोधात वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात खुनाचा, तर कोरेगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल राजेंद्र कुंभार असे आरोपीचे नाव आहे. तो गेले काही दिवस या विद्यार्थिनीच्या मागे फिरत होता. मात्र, ती प्रतिसाद देत नसल्याने तो चिडला होता. पिंपोडे येथील बस स्थानक परिसरात एक खासगी क्लास आहे. संबंधित विद्यार्थिनी अकरावी वाणिज्य शाखेत शिकत होती. नेहमीप्रमाणे सकाळी ती क्लाससाठी आली होती. क्लास साडेनऊ वाजता सुरू होणार होता. शिक्षक उपस्थित नसताना या परिसरात दबा धरून बसलेला आरोपी निखिल तत्पूर्वीच क्लासमध्ये आला. काही समजण्यापूर्वी त्याने विद्यार्थिनीवर चाकू हल्ला केला.