
अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या विविध ऑफशोर प्लॅटफॉर्मवर पद्धतशीर चोरी करून पसार होणाऱ्या एका टोळीच्या यलोगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मासेमारीच्या नावाखाली चोरीचा कारभार करणाऱ्या 11 जणांना बेडय़ा ठोकून पोलिसांकडून त्यांच्याकडील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे. याशिवाय ओएनजीसी ऑफशोरच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या 37 बोटींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
वाढत्या गुह्यांची गंभीर दखल घेत उपायुक्त विजय सागर यांच्या मार्गदर्शनाखाली यलोगेट पोलिसांनी गुह्यांचा तपास सुरू केला तेव्हा ‘कौशल्या राम शेटवी’ या मासेमारी बोटीचा मालक व खलाशी हे कृत्य करत असल्याची माहिती समोर आली. आरोपी हे पेण तालुक्यातल्या दादर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांची दोन पथके तयार करून 11 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ओएनजीसीच्या विविध निर्जन ऑफशोअर प्लॅटफॉर्मवर चोरी केल्याची कबुली दिली. तसेच इतर चोरीच्या गुह्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले.
दरम्यान, बेकायदा मासेमारी केल्याप्रकरणी 37 बोटींविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले. यात 30 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
असे करायचे चोरी
आरोपी मासेमारी बोटीतील जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रातील ओएनजीसीच्या निर्जन ऑफशोअर प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचायचे. दिवसा प्लॅटफॉर्मची पाहणी करून तेथे सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ व हालचालींची माहिती घ्यायचे. मग रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर जाऊन चोरी करायचे. चोरी केलेला मुद्देमाल मासेमारी बोटीतील मासे ठेवण्याच्या खणात लपवून घेऊन जायचे. त्यामुळे पोलीस, तटरक्षक दल किंवा नौदलाच्या तपासणीवेळी चोरीचा माल सहज दिसून येत नसायचा.
























































