नगर जिल्ह्यात आवक वाढल्याने कांदा दरात घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-market

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाले आहेत. दरांमध्ये सतत चढउतार होत आहे. आवक वाढल्याने व निर्यातबंदी असल्याने दर खाली आले आहेत. सध्या एक नंबरच्या कांद्याला 2000 ते 2250 रुपयाचा दर मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा दर होता. दर घसरत असल्याने निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यामध्ये यंदा परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या दुष्काळ, पाणी टंचाई यांमुळे क्षेत्र घटले होते. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला. आवक आणि मागणी यात मोठी तफावत असल्याने गेल्या चार महिन्यांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. नगर, घोडेगाव, राहाता, पारनेर बाजार समितीत कांद्याला क्विंटलला पंधरा ते वीस हजारापर्यंत दर गेला. केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. त्यामुळे आता काद्यांचे दर घसरले आहेत. नंबर दोनच्या कांद्याला 1600 ते 1900, नंबर तीनच्या कांद्याला 1000 ते 1500, तर चार नंबरच्या कांद्याला 300 ते 900 रुपयाचा दर मिळाला आहे. अन्य बाजार समितीतही असेच दर आहेत. यंदा, कांद्याला चांगले दर मिळत असल्याने लागवड केली. पण, आता दर पडत असल्याने खरीपाच्या कांद्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याच्या ठोक दरात घसरण होत असली तरी किरकोळ दर मात्र चढेच आहेत. ठोक दरात 1500 हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जाणारा कांदा किरकोळ दरात मात्र 30 ते 35 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी दर उतरलेले असले, तरी ग्राहकांना मात्र जास्तीच पैसे मोजावे लागत आहेत.