सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली रशियान विद्यार्थी गिरवतात देवनागरीचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली मराठी भाषा आणि लिपीचं सौंदर्य देशाबाहेर पोहचवण्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव वेगवेगळे प्रकार करीत असतात. सद्यस्थितीत रशियातील 40 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन देवनागरी सुलेखनाचे धडे गिरवित आहेत. हे सर्व विद्यार्थी संस्कृतचे अभ्यासक असून पुढील वर्षात म्हणजेच 2023 साली रशियात देवनागरी लिपीवर आधारित कलात्मक प्रदर्शन भरवण्यासाठी पालव हे रशियन विद्यार्थ्यांकडून काम करून घेत आहेत. देवनागरी शिकण्यासाठी त्यांना लागणारं लेखन साहित्य म्हणजे बोरू, देवनागरी कट केलेला पेन आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं ‘पालवांचं B2C’ देवनागरी हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवलं आहे.

स्वर, व्यंजन, बाराखडी, चिन्ह, जोडाक्षरं आणि शेवटी परिच्छेद लेखन असा सराव झाल्यानंतर पुढे मग प्रदर्शनाची तयारी, अशा 6 सत्रांमध्ये हा क्लास विभागला असून रविवारचा तिसरा क्लास संपला. मुलांचा देवनागरी भाषा शिकण्याचा आणि काम करण्याचा उत्साह पाहून पालवांनाही त्यांना शिकवायला मजा येत आहे. आपली देवनागरी लिपी परदेशी मुलं शिकतात, त्यावर काम करतात. हे पाहण्याचा आनंद शिकविण्याइतकाच असतो, अशी भावना यावेळी पालव यांनी व्यक्त केली.

पालव यांना 2008 साली रशियात सेंट पिटर्सबर्ग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी सेमिनारमध्ये प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच 2010 साली मुंबईतल्या रशियन सेंटरच्या पुढाकाराने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या विद्यार्थ्यांचे देवनागरी लिपीवर आधारित प्रदर्शन आयोजित केले होते. लवकरच रशियन विद्यार्थ्यांचा देवनागरी लिपीतला कलाविष्कार पाहायला मिळेल, अशी आशा सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केली आहे.