
पेन्शनसाठी ऑनलाईन नंबर सर्च करणे वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. तासाभरात पेन्शन देतो असे सांगून ठगाने वृद्धाच्या खात्यावर डल्ला मारला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदाराच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झालेली नव्हती. त्या रकमेसाठी त्याने ऑनलाईनवर नंबर सर्च केला. त्या नंबरवर तक्रारदार याने फोन केला. काही वेळाने त्यांना दुसऱ्या नंबरवरून फोन आला. आपण ईपीएफओ कार्यालयातून बोलत असल्याच्या भूलथापा मारल्या. आपण दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास तासाभरात पेन्शनची रक्कम बँक खात्यात जमा होईल असे त्याना सांगण्यात आले. ठगाने त्याना मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्यानंतर त्याने त्याचा आयडी आणि पासवर्ड शेअर केला. ठगाने त्याना 10 रुपये शुल्क म्हणून भरण्यास सांगितले. ठगाने त्यांना बोलण्यात गुंतवून त्याच्या खात्यातून पैसे काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.































































