ऑनलाइन पेपर तपासणीत विद्यापीठाला १०० टक्के!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विविध परीक्षांच्या ऑनलाइन पेपर तपासणीत मुंबई विद्यापीठाला यंदा १०० टक्के गुण मिळाले आहेत. ऑनलाइन पेपर तपासणी सुरू केल्यावर गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रखडलेले विद्यापीठाचे निकाल यंदा नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या चोख नियोजनामुळे जुलैमध्येच विक्रमी वेळेत जाहीर झाले आहेत. विद्यापीठातील टीवायबीकॉमच्या प्रश्नपत्रिका लाखोंच्या घरात होत्या, पण साडेपाच हजार प्राध्यापकांनी तब्बल ५ लाख ३३ हजार ५१२ उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली हे विशेष.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सुहास पेडणेकर पेपर तपासणीसाठी सतत इन अॅक्शन होते. कुलगुरूपदी नियुक्तीनंतर डॉ. पेडणेकर यांनी इतर कार्यक्रम न करता पूर्ण लक्ष पेपर तपासणीवर केंद्रित केले. दररोज सकाळ-संध्याकाळ परीक्षा विभागात हजर राहून कुलगुरूंनी पेपर तपासणीचा आढावा घेतला. शनिवारी-रविवारीही त्यांची परीक्षा विभागात उपस्थिती होती. तसेच वेळोवेळी प्राचार्यांच्या भेटी घेऊन पेपर तपासणीची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जे प्राध्यापक सुट्टीवर जाणार आहेत त्यांनी आधी पेपर तपासणीची जबाबदारी पार पाडून मगच सुट्टीवर जावे, असे कुलगुरूंचे आदेशच होते.

टीवायबीएचा निकालही जाहीर
विद्यापीठाने सोमवारी रात्री उशिरा टीवायबीए सेमिस्टर ६चा निकाल जाहीर केला. या निकालाची टक्केवारी ७३.५९ इतकी असून परीक्षा दिलेल्या १७ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ६११ विद्यार्थी पास झाले आहेत. श्रेणीनुसार बीएचे ६६० विद्यार्थी ‘ओ’ श्रेणीत, ४ हजार ११७ विद्यार्थ्यांना ‘ए’, ३ हजार ४०४ विद्यार्थ्यांना ‘बी’, १ हजार ८११ विद्यार्थ्यांना ‘सी’ तसेच ५५ विद्यार्थ्यांना ‘डी’ तसेच ६४ विद्यार्थ्यांना ‘ई’ श्रेणी मिळाली आहे. बीएच्या ९३,४२७ उत्तरपत्रिका तब्बल ५,५०२ शिक्षकांनी तपासल्या. यातील ६,८४७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले.

उन्हाळी सत्राच्या मूल्यांकनासाठी विविध विद्याशाखेचे अधिष्ठाते, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक कार्यामुळेच परीक्षांचे निकाल वेळेमध्ये जाहीर झाले क होत आहेत, याचे श्रेय या सर्वांना जाते. – डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

नियमित विद्यार्थ्यांचे निकालाला प्राधान्य
विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएसस्सी या नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त निकाल जाहीर केले आहेत. आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे निकालही येत्या काही दिवसांत लावण्याला विद्यापीठाचे प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशास अडचण येऊ नये, यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने परीक्षा विभागातील यंत्रणा कामाला लागली आहे.

अशी आहे विद्यापीठाची कामगिरी
– पेपर तपासणीत प्राध्यापकांना येणाऱया तांत्रिक अडचणी सर्वप्रथम सोडविण्यात आल्या. प्राध्यापकांना सुलभरीत्या लवकरात लवकर तपासणीसाठी प्रश्नपत्रिका कशा उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात आली.
– विद्यापीठाच्या ४९० अभ्यासक्रमांपैकी १२३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत.
– मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या परीक्षांपैकी ९० टक्के परीक्षांचे निकाल घोषित झाले.
– तांत्रिक शाखेच्या परीक्षा १५ जूनला संपल्या आहेत. या परीक्षांची ९५ टक्के पेपर तपासणी पूर्ण झाली आहे.
– बीए, बीकॉम, बीएस्ससी, बीएसस्सी आयटी चे ९० टक्के निकाल लागले असून आता पदव्युत्तर परीक्षांचे निकाल येत्या ३० दिवसांत लावण्यात विद्यापीठाचा भर आहे.
– ज्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळते असा बीएमएसचा निकालही १५ दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
– सेमिस्टर-५ मध्ये पुनर्तपासणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही वेळेआधीच जाहीर झाला जेणेकरून विद्यार्थ्यांना सेमिस्टर-६ ला बसता यावे.
– आता केवळ लॉचे निकाल लावणे बाकी आहे. लॉची परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवडय़ात संपली आहे.