स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून बंद असलेली नोकर भरती प्रक्रिया आता हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना यशस्वीपणे नोकर भरतीला सामोरे जाता यावे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने प्रथमच ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शिवसेना सचिव, महासंघाचे सरचिटणीस, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीयीकृत उद्योगाबरोबरच राज्य सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त मराठी तरुणांची भरती व्हावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने नेहमी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे शक्य नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ऑफिस अटेंडन्टच्या 257 जागा भरण्यासाठी काढलेल्या जाहिरातीनुसार परीक्षेला सामोरे जाणाऱया उमेदवारांची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे.

त्याला मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नोकरभरतीत मराठी तरुणांना 80 टक्के प्राधान्य मिळाले पाहिजे, स्पर्धात्मक परीक्षांमध्येही नैपुण्य दाखवता यावे म्हणून अवश्यक प्रशिक्षण वर्ग घेण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघावर सोपवली आहे.

नोकरभरतीत मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी त्याचा फायदा झाला असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी रिझर्व्ह बँक स्थानीय लोकाधिकार समितीचे अजित सुभेदार, हेमंत गुप्ते, महासंघाचे पदाधिकारी वामन भोसले, उमेश नाईक (प्रशिक्षण वर्गप्रमुख), शरद एक्के, श्रीराम विश्वासराव, दिनेश बोभाटे, विलास जाधव, सुधाकर नर यांनी परिश्रम घेतले.