
सहकार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या हौसिंग सोसायटय़ा आपल्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी खूशखबर आहे. सोसायटीने स्वयंपुनर्विकास अंतर्गत इमारत उभारल्यानंतर त्यामध्ये सभासदाला मिळणारी सदनिका नावावर करताना केवळ एक हजार रुपये एवढे नाममात्र मुद्रांक शुल्क संबंधित सभासदांना भरावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने स्वयंपुनर्विकास करणाऱया हौसिंग सोसायटीमधील मूळ सदनिकाधारकांना आणि गाळेधारकांना सदनिका देताना कोणताही वेगळा करार करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसू नये म्हणून सरकारने मुद्रांक शुल्काची रक्कम केवळ एक हजार रुपये केली आहे. त्यासाठी संबंधिताला आपण सभासद असल्याबाबतचे शेअर सर्टिफिकेट सादर करावे लागेल.
वाढीव क्षेत्र घेतल्यास मुद्रांक शुल्क लागणार
हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासात नियमानुसार मिळणाऱया क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र सभासदाला हवे असल्यास त्याला त्यावर बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तसेच स्वयंपुनर्विकासात उभारण्यात आलेल्या इमारतीत तयार होणाऱया नवीन सदनिका आणि गाळे बाहेरील व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्यासाठी मात्र बाजारभावानुसार संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल.


























































